Sunday 5 May 2019

भूतदया

रात्रीचा आडीच वाजण्याचा सुमार, रात्र काळोखी,  निभीड अंधकाराची चादर धरित्रीवर  पांघरलेली, श्रष्टी निद्रेच्या अधीन झालेली, आम्हीही गाढ झोपेत. अचानक किंकाळण्याचा आवाज कानावर पडू लागला! जणू कांही कुणीतरी रडत भेकत आर्त सूरात मदतीसाठी साद घालतंय असं वाटू लागलं! झोप उडाली, उठून बसलो आणि आवाजाचा वेध घेवू लागलो, माझ्या अगोदरच माझी भाच्ची पद्मश्री उठून दरवाजा उघडत होती, झोपेतच तीला कुणीतरी बाहेर न जाण्याची सूचना करत होते परंतू काळजाचा ठोका चुकवणाऱ्या आवाजामुळे ती ऐकण्याच्या मनस्थितीतच नव्हती! दरवाजा उघडून ती वेगाने आवाजाच्या दिशेने एक व्याकूळ हरणी आपल्या पाडसाच्या काळजीने सुसाट धावून जाते तशीच तिची गत!

माझ्याही डोळ्यावरची झोप उडाली बैटरी घेऊन  तिच्या मागे धावलो. पद्मश्रीला पूर्वानुभवे आवाजाचा वेध निश्चित आला होता, गल्लीतल्या नालीच्या दिशेने ती अंधाराची तमा न बाळगता जात होती, बैटरीचा प्रकाशझोत टाकत तीच्या पाठोपाठ मीही नालीच्यादिशेन धावलो. चोहीकडे गुडुप अंधार पसरलेला, आकाशातील चांदण्यांच्या मंद प्रकाशात पद्मश्री नालीजवळ पोहचताच एक कुत्री तीच्या दिशेने भूंकत आली, मीतर घाबरूनच गेलो वाटलं आता ही कुत्री पद्मश्रीचे लचके तोडणार, मी ओरडुन तीला मागे फिरायला सांगत होतो पण झालं विपरीतंच, पद्मश्री जवळ येताच कुत्री शेपटी हालवत, कुंई कुंई विव्हळंत तिच्या भोवती गोलाकार घिरट्या घालू लागली, नालीतून कुत्रीच्या नवजात पीलांचा विव्हळण्याचा आवाज येत होता!

पद्मश्री नाल्यावर ओणवी झाली आणि नालीच्या घाणेरड्या पाण्यात हात घालून एक एक करत तीनही पीलांना बाहेर काढले. पीले घाणीने भरलेल्या अंगांनी कुंई कुईं करत पद्मश्रीच्या पायावर कृतज्ञतेने लोळन घेऊ लागली. पीलांची आई आनखीही पद्मश्रीच्या भोवती शेपटी


हलवत घीरट्या घालत होती परंतू तीच्या आवाजातली अगतिकता नाहिशी झाली होती आणि जणू ती कृतज्ञभावाचं प्रदर्शन करत तीचे आभार मानत होती. समोरच्याच एका घराच्या बंद गेटमधून एक महिला शीव्यांची लाखोली वहात होती! कारण पीलांच्या ओरडण्यामुळे तीची झोपमोड झाली होती!

जीवाच्या अकांताने ओरडनारी पीले, त्यांच्या आईची अगतीकता, पद्मश्रीचा भूतदयेचा भाव आणि झोपमोडीमुळे महिलेची शीव्यांची लाखोली! खरोखरच हा इवलासा प्रसंग मानवी स्वभाव, प्रवृत्तीचे किती चपखलपणे वर्णन, विश्लेषण करतो बघा...

विव्हळण्याच्या आवाजाने पद्मश्रीच्या जीवाची घालमेल, प्रसंगाचे गांभीर्य ओळखून स्वतःच्या जीवाची पर्वा न करता, आपण कोणाची मदत करतोय, मदत केल्यावर आपला काय फायदा होईल का, या विचारांंनी मनाला यत्किंचीतही स्पर्श केला नाही. एवढाच विचार मनात की कोणीतरी संकटात सापडलेले आहे. त्याला संकटातून वाचवण्यासाठी आपण धावून गेलंच पाहिजे आणि ते माझे कर्तव्यच आहे. एवढाच विचार करून धावत जाणे, यालाच भूतदया म्हणतात. ती पद्मश्रीच्या मनात भिनलेली. अशी माणुसकी जपणारी माणसं आपल्या अवतीभवती असतात म्हणूनच आपम निश्चितपणे, विश्वासाने आणि निर्धास्तपणे जगत असतो.


पद्मश्रीला धोका पत्करू नको म्हणून आपल्याच कोषात गुरफटून गेलेली, फक्त आपण स्वतः सुरक्षित जगणे स्विकारणारी माणसे दुसऱ्याच्या मदतीला काय धावून जाणार! मात्र स्वत:वर संकट कोसळले तर अवघ्या जगाने आपली मदत केली पाहिजे अशी त्यांची धारणा मात्र पक्की असते. 


पद्मश्रीने धोका पत्करलाय हे लक्षात येताच आपणही मदतीला गेले पाक्षहिजे अशी सहकार्याची स्वाभाविक भावना बाळगणारेही याच समाजात वावरताना दिसतात. म्हणून स्वतःचा जीव धोक्यात घालणाऱ्यांंनाही पाठबळ मीळते आणि उत्साहाने ते परत संकटात सापडणाऱ्यांच्या मदतीला धावून जातात.


कुत्री आणि तीची पीले मदतीला आलेल्या व्यक्तीप्रती कृतज्ञता बाळगून असतात.


आणि कोणाचा जीव जात असेल तर आम्हाला त्याचं काय देणे घेणे, आम्हाला मात्र कोणाची झळ नाही पोचली पाहिजे. काय म्हणावे अशा वृत्तीला. बेफिकीर, आपमतलबी की आणखी काही! याची मी तरी वर्गवारी करू शकत नाही.




Monday 29 April 2019

Morning walk.

"Morning Walk"

अर्थात प्रभात फेरी

 

प्रभात समयी फिरायला जाणे हे कायीक(शारीरिक) व मानसिक तंदुरुस्ती साठी  ("Physically and Mentally Fitnes")

अत्यंत फायदेशीर आहे हे सर्वश्रुत, सर्वज्ञात आहे. तरीही आपण दुर्लक्ष करतो. इतर कोणत्याही व्यायामापेक्षा चालण्याचा व्यायाम उत्तम तर आहेच आणि तो सहजशक्य आणि सोपा आहे. या व्यायामासाठी कुठल्याही प्रकारचा खर्च करण्याची गरज नाही, कुठल्याही साधनांची,

साहित्याची आवश्यकता नसते.

तरीही बरेच लोक फिरण्याचा कंटाळा करतात. कारण एकमेव सांगितले जाते की "आम्हाला वेळच मीळत नाही हो." पण लक्षात घ्या की, तुम्ही आता वेळ नाही दिला तर पुढेचालून शारीरिक दुर्बलता येईल, अनेकानेक आजाराना बळी पडावे लागेल. नैराश्य (Dispersion) येवून जीवन जगण्याचाच कंटाळा येईल.आपले नातलग, मित्रही आपल्याला कंटाळून जातील.

म्हणून वेळेचे कारण सांगत बसलात तर ती वेळ दवाखाना, डॉक्टर यांच्यासाठी द्यावी तर लागेलच आणि प्रचंड पैसाही खर्च करावा लागेल. मग ठरवाच एकदा की, पुढील पैसा, वेळ वाचवण्यासाठी. आता कंटाळा दूर करून रोज सकाळी लवकर उठून स्वत:साठी किमान एक तास वेळ देता येणार नाही काय? हा प्रश्न स्वत:च स्वतःला विचारा.

आता लवकर उठून फिरण्याचे किती आणि कसे फायदे आहेत तेही जरा पाहूयात. 

१) आपले शरीर निरोगी, तंदुरुस्त व चपळ रहाते,

२) दहा मिनीटात एक किलोमीटर या वेगाने झपझप चालल्यास श्वासोच्छ्वास वेगाने होतो आणि शरीरास शुद्ध ऑक्सिजनचा पुरवठा भरपूर प्रमाणात होतो ज्यामुळे रक्तशुद्धी होवून रोगाचे मुळ कारणच नष्ट होते आणि दिर्घायुष्य लाभते. शुद्ध ऑक्सिजनचा शरीराला पुरवठा झाल्यामुळे श्वासाची दुखणी आटोक्यात येतात. थकवा कुठल्या कुठे पळून जातो. 

३)झोप चांगली लागते कितीतरी लोक झोप लागत नसल्याने त्रस्त असतात. यालाच निद्रानाशाचा रोग जडला असे 

म्हणतात. त्यापासून सुटका होते. मनाची एकाग्रता वाढून मन शांत रहाते अर्थात चिडचिडेपणा नाहीसा होतो. शारीरिक, मानसिक तंदुरुस्ती येते.  

४) जास्तीचे उष्मांक जळून चरबी कमी होते, आणि वजन घटते त्यामुळे शरीराची स्थुलता, जाडी कमी होते. समाजात वावरताना, "भीक नको पण कुत्रे आवर." म्हणण्याची वेळ आपल्यावर येते. 

शरीराच्या जाडीमुळे आपण लोकांसाठी कायमच उपहासाचा विषय बनलेलो असतो.

५) आपले ह्रदय तहहयात सतत धडधडत असते, दर मिनिटास बाहत्तर वेळा ते अकुंचन प्रसरन पावत असते. शरीर पोषणासाठी रक्त पुरवठा करण्याचे अविरत काम ह्दयच तर करत असते. 

६) शरीरातील प्रत्येक अवयवांना कार्यशील ठेवण्यासाठी रक्ताचा पुरवठा रक्तवाहिन्याद्वारे होत असतो त्यावेळी या रक्तामध्ये कार्बन, निरनिराळे दुषीत घटक मिसळून रक्त अशुद्ध बनते. हेच अशुद्ध रक्त परत ह्रदयाकडे येते. तेथे श्वासाद्वारे फुफ्फुसात आलेला ऑक्सिजन रक्तात मिसळून रक्त शुद्ध करण्याची प्रक्रिया घडते. त्याचवेळी रक्तातील कार्बन, दुषीत घटक उच्छवासाद्वारे बाहेर फेकले जातात आणि तेच रक्त शुद्ध म्हणजे ताजे तवाने बनून आपणही ताजे तवाने बनतो. 

यालाच रक्ताभिसरण म्हणतात. चालण्याच्या व्यायामामुळे रक्ताभिसरण कार्यक्षमतेने होते. हा श्वासोच्छवास सातत्याने नियमित चालू असतो जर का तो बंद झाला तर माणसाचे आयुष्य संपलेच म्हणून समजा.

७) सकाळच्या कोवळ्या उन्हात फिरायला गेल्यास सूर्य तुम्हाला मोफच 'ड' जीवनसत्त्वाचा पुरवठा करत असतो त्यामुळे आपली हाडे बळकट, मजबूत बणतात, गुडघेदुखी, पाठदुखी, सांधेदुखी कुठल्या कुठे पळून जातात, संधीवाताचा त्रास कमी होतो.

८) चयापचयाची क्रिया सुधारते म्हणजे पचनशक्ती वाढते आणि भूक सपाटून लागते, अन्न पचन झाल्यामुळे मलबद्ध, बद्धकोष्ठ इत्यादी विकार नाहीसे होतात.

९) फुफ्फुसाची क्षमता वाढल्यामुळे आपली कार्यक्षमता वाढते मग कठीण कामही सहजसाध्य होते. मग काय आपली उत्पादक क्षमता वाढून उत्पन्नही वाढते त्यामुळे आपली आर्थिक सक्षमताही वाढते.

१०) समुहाने फिरत असालच तर चालतांना बोलत जाण्याऐवजी झपाझप चालत जा आणि एका ठिकाणी बसून हास्यविनोद करा खूप खळखळून हसा. हसण्यामुळे फुफ्फुसालाही चांगला व्यायाम होऊन श्वसनाचे विकार दूर होतात. हास्यविनोदामुळे नैराश्य दूर होते, परस्पर संवाद साधला जाऊन परस्पर नात्यामध्ये जवळीक, आपुलकी निर्माण होते. हीच नाती संकटकाळी धाऊन येतात. माणसाचं हसणंच हरवून गेलंय म्हणूनच हास्यक्लब स्थापन करण्याची वेळ आली आहे।

 

 ११) लवकर उठून फिरायला जाण्याचे किती म्हणून फायदे सांगावेत, ह्रदयरोग, मधुमेह, रक्तदाब अशी भलीमोठी यादीच सांगता येईल.

चुकीच्या पद्धतीने चालले तर फायद्याबरोबरच कांही दुष्परिणामांनाही सामोरे जायची वेळ येऊ शकते. "व्यक्ती तितक्या पृकृती" याची प्रचिती सकाळी फिरायला जाणाऱ्या लोकांकडे पहातांनाही येत असतेच. 

१) चालतांना कुणाचातरी प्रभाव मानगुटीवर घेवूनच बरेचजण फिरत असतात, त्याची ही कांही नमुनादाखल उदाहरणे,

एका किंवा दोन्हीही बजूला झुकत झुकत, डुलत डुलत चालणे. वेगाने चालण्याच्या हेतूने पाठीतून पुढे झुकत भरभर चालणे, यामुळे 

कमरेतील, मानेतील मणक्यावर ताण पडून पुढेचालून मणक्यामधील कुर्चा झीजते व कमरदुखीचा, मानदुखीचा (Spondylitis) त्रास उद्भवू शकतो. 

२) गुडघ्यातील, घोट्यातील सांध्यावर ताण पडून गुडघेदुखीचा त्रास अकाली सुरू होवू शकतो, त्यामुळे दवाखाण्याचा फेरा तर पाठीमागे लागतोच, शारीरिक वेदनेलाही बळी पडावं लागतं, वेळ पैसा वाया जातो तो तर वेगळाच.

२) गप्पा मारत चालणे, उदाहरणार्थ बायकांना घरी निवांतपणे बोलायला वेळच नसतो, त्यांना तरी चुकीचे कसे म्हणावे. पुरुषप्रधान संस्कृतीखाली आणखीही त्या दबूनच आहेत. घरात मोकळेपणाने बोलता येत नसल्याने मग फिरतांना उणीदुणी, उखाळ्या-पाखाळ्या काढत फिरण्याच्या मुख्य उद्देशाकडे दुर्लक्ष होते. आपण चालत असतांना शरीरामध्ये उर्जा निर्माण होत असते ती बोलण्यामुळे शरीरात साठण्या ऐवजी नष्ट होत जाते आणि चालण्याच्या व्यायामाचा व्हावा तसा फायदा होत नाही.

प्रभात समयी नियमितपणे तासभर चालण्यासारखा सोपा आणि बीनखर्ची दुसरा व्यायाम नाही, खात्रीपूर्वक सांगतो व्यायामशाळेत ("geam") जायचीही गरज नाही. जीमच्या कितीतरी पट फायदा सकाळी झपाझप चालण्यामुळे होतो.

मग काय करा निश्चय आणि उद्या सकाळीच फिरायला निघा.

Sunday 28 April 2019

निरोगी जीवन शैली.


     समाजामध्ये जेंव्हा आपण वावरतो त्यावेळी लक्षात येते की आसपास निरोगी माणसा पेक्षा कोणी ना कोणी डोक्यावर कुठलातरी आजार घेवूनच वावरत असतो. रक्तदाब, ह्रदय विकार, मधुमेह, शरीराची न पेलवणारी जाडी, ज्यामुळे गुडघेदुखीने त्रस्त, कमरेच्या मानेच्या मनक्यातील विकारामुळे कमरेला आणि गळ्याला पट्टा (ज्याला बेल्ट असं सुंदर नाव दिलेलं) असे कितीतरी आजार सांगता येतील. असं का होतं, आपण आपली जीवनशैली, जीवनपद्धती, जीवनाकडे पहाण्याचा दृष्टिकोन, अधुनिक जीवनपद्धती या गोंडस नावाने जगतात. असं का होतंय, ही वेळ आपल्यावर कोणी आणली या प्रश्नाचे उत्तर शोधायला गेलो तर एक आहे प्रदुषित वातावरण, दुसरं आहे माणसाच्या मनावरील ताणतणाव. याला कारणीभूत कोण आहे तर तो एकमेव मनुष्य प्राणीच.

आपल्या आरोग्यदायी, सुखी, आनंदी जगण्यासाठी दिवसातून किमान एक तास तरी काढू शकत नसाल तर कुरकुरत, चिडत चरफडत, देवाला दुषणे लावत आयुष्यभर जगण्याचा पर्याय निवडावा. जर आयुरारोग्य, सुख, आनंद आपल्या वाट्याला यावा असं मनापासून वाटत असेल तर स्वत:साठी आपण वेळ द्यायलाच हवा. प्रभातफेरी अर्थात सूर्योदयापूर्वी फिरने, योगासने, प्राणायाम यासाठी वेळ देणे अत्यंत आवश्यक आहे. 

आपल्या आगोदरची पीढी ऐंशी नव्वदीपर्यंतच्या आयुष्यात एक सुद्धा गोळी किंवा ईंजेक्शनही घ्यावे लागले नाही असे अभिमानाने सांगायची. त्याचं एक कारण आहे, त्यावेळी त्यांच्या वाट्याला आजच्या सारखे तणावग्रस्त, वैफल्यग्रस्त जगणं मुळीच नसे, शुद्ध पाणी, शुद्ध हवा मुबलक असायची. निसर्ग भरभरून देत असतो निसर्गाप्रती तो कृतज्ञता बाळगून असायचा. दिवसभर काबाडकष्ट करून रात्री आठ वाजताच शांतपणे झोप लागे. या उलट आजची पिढी मात्र चाळीसीच्या आतंच मधुमेह, रक्तदाब, ह्रदयरोग, इत्यादी असाध्य रोगांना बळी पडत चालली आहे औषधे ही त्यांच्या अन्नाचा एक भागच बनली आहेत. कारण निसर्गाप्रती तो कृतघ्न झाला. बेसुमार वृक्षतोड करून अखंड ऑक्सिजन पुरवठा करणारे नैसर्गिक एअर कुलर (AC) तोडून फोडून उध्वस्त केले. सध्या त्याला शुद्ध पाण्यासाठी बाटलीबंद विकतचे पाणी (Minrai watar) प्यावे लागते. ऑक्सिजनची तीच अवस्था होणे फार काही दूर नाही, ऑक्सिजनच्या नळकांड्यांचं पाठीवर ओझं लादूनच त्याला घराबाहेर पडावे लागणार आहे! भौतिक सुखसुविधांसाठी नैसर्गिक जंगले तोडून सिमेंट कॉंक्रीटची जंगले उभी केली. ज्याचा दुष्परिणाम म्हणून आवर्षण, दुष्काळाला तोंड देऊ लागला. पर्यावरणाचे संतुलन ढासळत निरनिराळ्या रोगांच्या बळी पडू लागला. भौतिक मोठमोठे कारखाने उभारले, त्यांच्या चिमण्या कार्बन ओकू लागल्या, त्यांनी  वातावरणातील ऑक्सिजन हद्दपार केला आणि कार्बनडाय ऑक्साईडने श्र्रुष्टिचा जीव गुदमरून गेला आहे!

अपेक्षांच्या ओझ्याखाली नाहक स्वतःला गाडून घेत, अकारण ताण-तणावाला बळी पडत आहे. माहितीच्या महाजालात (Internet) अडकून माणुस माणसापासून, नात्यापासून दुरावत चालला आहे,


त्यामुळेच की काय तो एकलकोंडा बणत चालला आहे, सुखदुःखात सोबत रहाणारी माणसं कुठे तरी दूर सोडून तो जगण्याच्या प्रवासाला


निघाला आहे. आपेक्षांचं ओझं भिरकावून देणे त्याला जमत नाही.


अपेक्षा या पूर्णपणे कधीच सफल होत नसतात हे माहित असूनही, आपण मृगजळाच्या पाठीमागे धावत सुटतो, तृष्णा तृप्त तर होत नाहीतंंच परंतू धाप लागून आपलेच उर फोडून घेत आहोत.


त्यामुळे होतो अपेक्षाभंग, अपेक्षाभंगाचं कारण तरी काय असावं,


हार-जीत, शल्य, दु:ख पचवण्याची ताकतच माणसात उरलेली नाही यश, प्रसिद्धी, धन-संपत्ती विनासायास आणि मनाजोगती मीळत नाही म्हणून मन:शांती ढळून तो वैफल्य ग्रस्त झाला आहे, नैराश्य, चीडचीड, संताप आणि मग जीवच नकोसा होनं सर्वसामान्य झालं आहे, आयुष्याला कंटाळून बऱ्याचदा तो आत्महत्या सारख्या आत्मघातकी नीर्णयाला बळी पडतो आहे.

हे कुठे थांबणार की नाही, यावर कांही उपाय आहे की नाही?


हो आहे ना निश्चितच, त्यासाठी चंचल मन स्थीर करायला हवं, अपेक्षांचं ओझं भिरकावून द्यायला हवं, हे सहजासहजी होत नसते, त्यासाठी हवी साधना, साधना साधना म्हणजे काय हो?.ती कांही डोंगर-दऱ्यात, पर्वतावर जावून करण्याची आवश्यकता नसते. आपण  वेळेचं कारण देतो,  "आहो आम्हाला वेळच मिळत नाही हो!" मात्र आपल्याला मोबाईलवर chating साठी भरपूर वेळ असतो, तीथे रात्र रात्र गेली तरीही चालते, टीव्ही समोर तासंतास घालवतो, नोकरी धंद्यासाठी, कुटुंबासाठी दिवसभर राब राब राबत असतो, मग स्वतःला याच कामाच्या तंदुरुस्तीसाठी दिवसभरात किमान एक तास तरी देऊ शकत नाही?

नाही पटंत...

सकाळी लवकर उठून निसर्गाच्या सानिध्यात प्रभातफेरीसाठी (अर्थात, Morning walk) एक तास देणं काहींच अवघड नसतं त्यासाठी हवा मनोनिग्रह! घरात सुद्धा ध्यानधारणा शक्य असते. दिवसभरात तास दीडतास योगासने, प्राणायामासाठी एखादा तास वेळ काढणे तरी कुठे अशक्यातील बाब आहे. मात्र त्यासाठी हवा मनोनीग्रह आणि निर्धार,


तो तर आपणच करणार, हो की नाही?

शांत आणि सुखी जीवनासाठी अन्न, पाणी, वस्त्र, निवारा या निकडीच्या गरजांबरोबरच योग, प्राणायाम, व्यायाम, ही पाचवी गरज ठरली आहे.


अजूनही वेळ गेलेली नाही, फार उशीर झालेला परवडणारा नसेल निश्चितच, वेळ कोणी दुसरे देणार नाही, म्हणून काढा वेळ आपणच आपल्यासाठी.


Sunday 26 July 2015

गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने.

गुरबिनु भवनिधि तरइ न कोई।
जो बिरंचि संकर सम होई॥

हिंदू संस्कृती मध्ये अगदी वेद, उपनिषद, गिता, पौराणिक ग्रंथामधून गुरू विषयीचा एक आदरभाव दिसून येतो. संसार सागरातून तारून नेणारी देवापेक्षाही महत्वपूर्ण असणारी मार्गदर्शक व्यक्ती असल्याची तुलसीदासांच्या रामचरितमानस मधील पदरचनेतूनही स्पष्ट होते. गुरू शिवाय संसार सागरातून कोणीही तरून जावू शकत नाही हा गुरु शंकरा समानच अर्थात परमेश्वररूप असतो हे तुलसीदासांनी फार प्रभावीपणे गुरूमहात्म्य विषद केले आहे.

परवा एक नाथपंथी दारावर येवून भजन गावू लागला, त्याने गायलेले हे भजन अजूनही मनात रुंजी घालतय...

बीन घन बीजली चमके रे
क्या मौज बड़ी गुरू घर की ॥धृ.॥

लाल गुंडेला सूरज झरके
झर लागे कंचन की॥

त्रीकुट धार चढकर जांवा
गगनमण्डल पर झलकी॥

गुरू घरची मजा कांही औरच आहे, तीथे ढग नसतांनाही वीज चमकते! अर्थात या गुरूघरात सतत ज्ञानरूप प्रकाशाच्या वीजेचा लखलखाट होत असतो! लाल गुंडेला सूरज अर्थात अज्ञानरूप अंधाराकडून ज्ञानरूप तेजाकडे हा प्रवास गुरूच्या कृपेने घडत असतो! तीथे मग मनातली आसक्ति नाहिशी होते आणि मृतिकाही सोने भासू लागते! इथे निष्पृहतेची शिकवन मिळते आणि धन लालसे पोटी होणारं मनातलं अराजक शांत होते!
संत कबीरदासांनी तर परमेश्वरापेक्षाही गुरूभक्ति श्रेष्ठ मानली आहे, ते म्हणतात...

गुरु गोविंद दोऊं खड़े काके लागू पाय
बलीहारी गुरु अपने गोविंद दियो बताय॥

जो गुरु परमेश्वराचं खरं रूप दाखवून देतो त्याच्यावरच मी समर्पित होईन! गुरू हा ज्ञानी असेल तरच तो शिष्यांना सन्मार्गी लावेल अन्यथा अज्ञानी गुरूच्या चुकीच्या मार्गदर्शनामुळे गुरु आणि शिष्य दोघांचाही कपाळमोक्ष ठरलेला म्हणून संत कबीरांनी अशा अज्ञानी गुरु पासून चार हात दूरच राहायला सांगीतले आहे! अज्ञान गुरूच्या संगतीने दोघांचंही अहीत ठरलेलं...

जाका गुरु अंधा चेला खरा निरंध
अंधा-अंधा ठेलिया, दुन्यूं कूप पडत॥

जगदीश गिरी

Thursday 4 September 2014

शिक्षक दिनानिमित्त.


शिक्षक दिनानिमित्त एक अनावृत्त पत्र



आदरणीय गुरूजी,       

आदरपूर्वक सप्रेम नमस्कार,


गुरूजी, ज्या ज्या वेळी मी शाळेला भेट देतो, त्या त्या वेळी मुख्याध्यापकाच्या दालनातील भिंतीवर लावलेल्या अब्राहम लिंकनच्या पत्राकडे माझं लक्ष आवर्जून वेधलं जातं. विद्यार्थ्याला सम्रद्ध, सुज्ञ, आत्मनिर्भर, कणखर व सुजाण नागरिक घडवण्याची विनंती केली आहे त्यांनी. ते पत्र भिंतीवर न रहाता विद्यार्थ्यांच्या ह्रदयावर कोरा. त्यांना खरा माणूस घडवा. मानवाच्या प्रमादामुळे भविष्यातील संकटाच्या नांदीचं एक भयावह दु:स्वप्न सृष्टीला पडत आहे.

या संकटाच्या खाईतून अखिल जीवसृष्टीला वाचवायचं असेल तर विद्य्यार्थ्याला शालेय शिक्षणातील विज्ञान तंत्रज्ञानासोबतच हेही शिकवावं लागेल की, माहिती तंत्रज्ञानामुळे अवघं विश्व कवेत सामावत चालंल आहे. परंतू आपल्या पारंपरिक शिक्षण पद्धतितील कांही त्रुटींमुळे तो स्वावलंबी बनण्याऐवजी परावलंबी बनतो आहे! पदवीधर असूनही स्वाभिमान गुंडाळून उदरनिर्वाहासाठी चहाची टपरी चालवन्यासारखी हलकी कामे करण्याची वेळ त्याच्यावर आली आहे! बेरोजगाराचे जथ्थे रस्तोरस्ती फिरत आहेत. हाताला काम नाही मिळालं तर नाविलाजास्तव स्वत:, आणि कुटुंबाच्या पोटाची खळगी भरण्यासाठी गुन्हेगारी प्रवत्तिकडे वळतो आहे! समाजक्षोभाला सामोरा जात स्वतःचा बळी देतोय! या सामाजिक संघर्षामध्ये त्याला जेता बणवायचं असेल तर त्याच्या क्षमता ओळखून, त्याचं कसब आणि कल ओळखून त्याच्या अंतरिक ऊर्जेला खतपाणी घालावे लागेल. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या कसोटीवर उतरणारं व्यावसायिक कौशल्य त्याला शिकवावं लागेल. रविंद्रनाथांच्या शांतिनिकेतन मध्ये हेच तंत्र अवलंबिले होते. अशा शिक्षणपद्धतिमुळे अकाशाला गवसणी घालणारे मोठमोठे कलावंत, चित्रकार, संगीतकार, साहित्यिक, नाटककार हे समाजात सामाजिक एकोपा नांदण्यासाठी पुरक ठरणारे घटक निर्माण होतील. निकोप समाजासाठी फक्त डॉक्टर आणि इंजीनियर पुरेसे नसतात हे पालकांच्या गळी उतरावयाला हवं! माणसामध्ये बळावत चाललेल्या स्वार्थलोलुपतेमुळे माणूस माणसापासून दुरावत चालला आहे. त्यामुळे या सृष्टीचं अस्तित्वच पणाला लागलं आहे. जगाचं, अखिल जीवसृष्टीचं अस्तित्व अबाधित ठेवायचं असेल तर काही जाणीवा, भान हे जागृत ठेवावं लागेल. याची शिकवणही त्याला द्यावी लागेल.

 निसर्गाने मानवाला विपूल साधन संपत्तीचं भांडार खुलं करून खैरात केली आहे. पण ही साधन संपत्ती हिसकावून, ओरबाडून घ्यायचा माझा जन्मसिद्ध हक्क आहे एवढंच तो शिकतो आहे. परिणामी सृष्टीचा घसा कोरडा पडतोय, जीव गुदमरतोय तिचा. तिच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे! पर्यावरणाचा -हास हे मानवा समोर उभारलेले सर्वात भयानक संकट आहे! बेसुमार जंगलतोड करून तो स्वत:च स्वतःच्या पायावर कुराड चालवत आहे! भौतिक सुवेधेच्या हव्यासापोटी कारखाने, मोटारीच्या माध्यमातून मानवाच्या नाकालाच कार्बनच धुराडं बनवलय! त्यामुळे अखिल मानवजातीचाच जीव गुदमरू लागला आहे! हे असंच चालंत राहिलं तर भविष्य अंधारात आहे. त्यासाठी पर्यावरण संतुलनाची पुस्तकी पोपटपंची शिकविण्यापेक्षा, सृष्टीच्या सानिध्यात जावून तिला गोंजारत तिचं रक्षण करणं, निसर्गाचा सन्मान करणं आपलं परमकर्तव्य आहे हेही शिकवावं लागेल.

आपण प्रभातसमयी राष्ट्रभक्तीचे 'जनगणमन', बंधुत्वाची 'प्रतिज्ञा', सदवर्तनाचा 'परिपाठ' घेता. तरीही राष्ट्रद्रोह मान वर करीतच आहे! जातीयता फोफावतच आहे! दुष्टप्रवृत्ती बळावत आहेत, म्हणून शब्दांच्या पलीकडील अर्थबोध त्यांना शिकवायलाच हवा. मर्यादांचे भान सुटत चालले आहे, रस्ता सुसाट बनलाय, अल्पवयातच तो दुर्व्यसनी बनत चालला आहे. एकतर्फी आंधळ्या प्रेमातून भररस्त्यावर विद्यालयाच्या पवित्र प्रांगणात दिवसाढवळ्या बलात्कार, खून, आत्महत्या होत आहेत! जन्म घेण्याआधीच स्त्री भ्रृणाचा गळा घोटला जातोय! प्रत्येक क्षेत्रात विसंवादाच्या अंधारात सुसंवाद हरवत चालला आहे. त्याच त्या चुकांची पुनरावृत्ती घडत आहे. म्हणून त्याला शिकवावा लागेल, आपल्या सम्रद्ध संस्कृतीचा वारसा, आत्मभान, सकारात्मक द्रष्टिकोण. आणि हेही जरूर शिकवा सन्मानाने जगा आणि इतरांनाही जगूद्याचा कानमंत्र, संयमाचं पालन, मर्यादाचे बांध आणखीन बरंच काही! त्यामुळे तो केवळ परिक्षार्थी नाहीतर खरा विद्यार्थी, एक माणूस घडेल.

गुरूजी, भविष्य घडवणं तुमच्याच हाती आहे. म्हणून त्याच्या सामाजिक जाणीवा जागृत करून, सामाजिक बदलासाठी चार भिंतीच्या बाहेरच्या जगाबद्दल सहिष्णू व सृजनशील बनवा. गुरूजी, हे तुम्हीच करू शकता आणि ते कराच.

 जगदीश गिरी

     शांतिबन हरिराम नगर,

    बीड बायपास रोड, औरंगाबाद.

Sunday 22 June 2014

येरे येरे पावसा .....!

       मृग नक्षत्र संपून आर्द्रा नक्षत्राचा प्रवेश झाला आहे, तरीही आणखीन खऱ्या अर्थाने पावसाळा सुरू झालेलाच नाही! पेरण्या खोळंबल्या आहेत, बळीराजा हवालदील झालाय! आम्ही शहरवासी हवालदील झालेलो नसलो तरी चिंताग्रस्त निश्चित झालो आहोत. अशा विमनस्क मनस्थितीत महाराष्ट्र टाईम्स वाचत बसलो होतो, औरंगाबादTimes चे "गाणं मनातलं" सदर वाचू लागलो तोच मुलांनी अचानक टी. व्ही. सुरू केला माझं मन विचलीत झालं, याला योगायोग म्हणावे की आणखीन काय? कळत नव्हते! कारण मुलांनी 'जिंगल टून्स' ने बालमित्रांसाठी बनविलेली खास कार्टून सीडी सुरू केली होती. त्यातील नेमकी पावसाची गाणी मुलांनी लावली होती, माझेही पेपर वाचनातले लक्ष उडाले होते! मुले आनंदाने गाण्याचा मनसोक्त अस्वाद लुटंत होती. मुलांच्या बालसुलभतेला मीही मुग्धपणे दाद देवू लागलो.....
लहानग्याच्या कृतककोपाने गाण्याला सुरूवात होते, त्याचं ते भाबडेपण, लटक्या रागाने पावसाला साद घालनं, रागाने बोट चावनं, कपाळाला हात लावून पावसाला.....

                                           येरे येरे पावसा रूसलास का
                                           माझ्याशी कट्टी तू केलीस का?
                                           झरझर तू येणार कधी
                                           अंगणात पाण्याची होईल नदी
                                           ढगांच्या मागे तू लपलास का
                                           माझ्याशी कट्टी तू केलीस का?
ही साद जीवाला चटका लावून जाते! पावसाची आर्त ओढ लहान थोरांना सर्वांनाच लागलेली असते फक्त त्याचे संदर्भ वेगवेगळे असतात, पावसाच्या आभावी थोरामोठ्यांना भविष्याची चिंता लागून रहायलेली असते. पाऊस नाही आला तर शेत कसं पिकेल, शेत नाही पिकलं तर खायचं काय? कुटुंबाचा उदरनिर्वाहासाठी काय करायचं अशा ना ना विवंचना सतावत रहातात. पण या विवंचना निरागस बालकांच्या गावीही नसतात त्यांना मौज मस्ती करायची असते आणि ती मौजमस्ती बालगीतकाराने या गाण्यात समर्थपणे उतरवली आहे बालगीतकारा सोबत मुले गार गार वाऱ्यासोबत चिंबचिंब भिजू लागतात!
                                           गार गार वाऱ्यात नाचेन मी
                                           खूप खूप पाण्यात भिजेन मी
                                           भिजायची टाळी मला देतोस का
                                           माझ्याशी कट्टी तू केलीस का?
         गाण्यातील गार गार वाऱ्याची झुळूक मुलांना नाचवीत होती, त्यांना पाण्यात खूप खूप भिजायचं होतं! परंतू आईची परवानगी मिळत नव्हती म्हणून त्यांनी रास्त पावसालाच साकडं घातलं होतं! मन भुतकाळात शिरलं, अरे! आम्हीही  असंच करायचो की! खरंच पिढ्यानपिढ्या हा खेळ चालत आला आहे आणि पुढे ही पिढ्यानपिढ्या तो चालत रहाणार आहे! माणसाच्या अन पावसाच्या पाठशिवणीचा खेळ युगानुयुगे असाच चालत रहाणार काय!
गाणं पुढे पुढे सरकत होत, बरं वाटत होतं वास्तवातील दाहकता विसरून मन गाण्याच्या तालावर भुतकाळात रमत होतं!
                                            धुमधार पाण्यात रस्ता बुडेल
                                            मग माझ्या शाळेला सुट्टी मिळेल
                                            गडगड आता हसतोसका
                                            माझ्याशी कट्टी तू केलीसका?
        किती किती पाऊस व्हायचा त्यावेळी, रस्तोरस्ती पाण्याचे पाट वाहू लागायचे, नदीनाले तुडूंब दुथडी भरून वहायला लागायचे! गावाला वळसा घालून जाणाऱ्या नदी किनाऱ्यावर गर्दी जमायची ऐलतिरी, तेवढीच शेतातून परतलेल्या अबालवृद्धांची पैलतीरीही! मदतीसाठी आरडाओरडा आरोळ्या देणं सुरू असायचं, पण रोंरावत धावणाऱ्या पाण्याच्या आवाजापुढे कोण काय म्हणतोय कळायचंच नाही! पूर ओसरला तरी मांड्या कमरेला पाणी लागायचे, लहानगे, बायाबापड्यांना वाहत्या पाण्यतून येता यायचं नाही. एकमेकांच्या मदतीला धावून जायची संस्कृती त्यावेळी जिवंत होती! स्वत:च्या जीवाची पर्वा न करता तरणीताटी पोरं मदतीला धावून यायची. हे अनुभवतानाचा आनंद स्वर्गातित असायचा! पावसाळा आलाकी या अनुभुतीचा आनंद घ्यायला मन आतूर व्हायचं! म्हणून असा धुवांधार पाऊस यावा रस्ते पाण्यात बुडून जावेत आणि शाळेला सुट्टी मिळावी अशी भाबडी आळवणी पावसाकडे करायची! मुले गाण्याचा आनंद लुटंत होती! पण माझे लक्ष आता उडाले होते. हेच गाणे माझ्यापुढे वेगळ्या संदर्भाने नाचू लागले......
                                           येरे येरे पावसा रूसलास का?
                                           (शेतकऱ्यांशी) कट्टी तू केलीस का,
                                          झर झर तू येणार कधी
                                          (शेतात पाण्याची बरसात कधी?)
                                          ढगांच्या मागे तू लपलास का
                                          (शेतकऱ्यांशी) कट्टी तू केलीस का?
         या ओळींनी मला अलगद उचलून गावाकडे नेले आणि हवालदिल झालेल्या माझ्या शेतकरी राजाचे ढगाकडे लागलेले आर्त डोळे, चेहऱ्यावरचे चिंताग्रस्त भाव माझ्या ह्रदयाला पीळ पाडू लागले! उन्हा तान्हात पाण्यासाठी वण वण भटकणाऱ्या माझ्या भगीनींच्या पायाला बसणारे चटके माझ्या पायाला जाणवू लागले! का हे चटके आम्हाला भाजून काढतायत? ही कुणाच्या करणीची देणगी आहे? मानवाला कुणी शाप दिलाय की काय? मग त्याचा परिणाम अवघ्या जीवसृष्टीला का भोगावा लागतोय? कारखान्याचं पसरलेलं जाळं, त्यामुळे वातावरणात कार्बनडाईआक्साइडमुळे होणारे वायुप्रदुषण, नदीनाल्यात सोडलेल्या दुषित पाण्यामुळे होत असलेल्या जलप्रदूषणामुळे अवघ्या जीवसृष्टीचं अस्तित्वच पणाला लागलय! भरीसभर आमच्या भौतिक सुखसोयी साठी विज्ञानाला वेठीस धरलय! म्हणून  ते वरदान ठरायच्या ऐवजी शाप ठरतयकी काय अशी भिती वाटू लागलीय! प्रदुषणाला आळा घालणाऱ्या वृक्षराजीवर कुराड चालवीतांना आम्ही आमच्याच पायावर कुराड चालवतोय याचं भानंच जणू आम्ही हरवून बसलोय!  हे भान सुदैवाने आम्हाला कधी येईल! पावसाचे नाही तरी माझ्या डोळ्यात पाणी तरळून गेले! गाणे मनात रुतून बसले!